महाराष्ट्रातील वनांचे प्रकार | Vanache Prakar in Marathi
Vanache Prakar in Marathi: चॅम्पिअन व शेठ यांनी केलेल्या वर्गीकरणानुसार राज्यातील वनांचे पुढील पाच प्रमुख प्रकार पडतात-
उष्ण-कटिबंधीय सदाहरित वने
(१) पश्चिम घाटातील जास्त पावसाच्या म्हणजे सर्व- साधारणत: २५० ते ३०० सें. मी. पर्जन्यमान असणाऱ्या व जांभी मृदेच्या प्रदेशात ही वने आढळून येतात.
(२) भरपूर पाऊस असल्यामुळे ही वने सतत हिरवीगार असतात; परंतु कमी प्रतीची जांभी मृदा व तीव्र उताराचे प्रदेश वनस्पतिजीवनाच्या वाढीस फारसे पोषक नसल्यामुळे या वनातील झाडांची वाढ मर्यादित स्वरूपातच होते.
(३) जांभा खडक असलेल्या भागात फक्त झुडपेच उगवतात.जास्त जाडीच्या जांभा खडकावर तर झुडपेही उगवू शकत नाहीत. या अडचणींमुळे भरपूर पाऊस असूनही राज्यातील या वनांत कमी उंचीचे वृक्ष व झुडपे यांचीच फक्त वाढ झालेली दिसून येते.
(४) डोंगरभागात चालणारी ‘कुमरी’ नावाने ओळखली जाणारी स्थलांतरित शेती व वणवे यांमुळेही या वनांची बरीच हानी होते.
(५) जांभूळ, पिसा, अंजन, हिरडा यांसारखी झाडे या वनांत आढळतात. यांपैकी फक्त हिरड्याला काहीसे आर्थिक महत्त्व आहे. इतर वृक्ष मात्र आर्थिकदृष्ट्या फारसे महत्त्वाचे नाहीत. या वनांपासून मिळणारे लाकूडही कमी प्रतीचे आहे.
(६) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने या प्रकारची आहेत.
आर्द्र पानझडी वृक्षांची वने
(१) राज्यातील १०० ते २५० सें. मी. पाऊस पडणाऱ्या प्रदेशात म्हणजे राज्याच्या पूर्व भागातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व अमरावती जिल्ह्यांतील मेळघाट परिसरात या प्रकारची वने आहेत. सह्य पर्वताच्या उतारावर नाशिक, पालघर, ठाणे व कोल्हापूर जिल्ह्यांतही या प्रकारची वने आढळतात. साधारणपणे ७०० मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात या प्रकारची वने आहेत.
(२) कोरड्या ऋतूमध्ये या वनातील झाडांची पाने गळतात. साग, आईन, हलदू, बोंडारा, कलम व काही प्रमाणात बांबू या प्रकारची झाडे या वनांमध्ये आढळतात. यांपैकी ‘साग’ हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष होय.
शुष्क पानझडी वृक्षांची वने
(१) १०० ते १२५ सें. मी. पाऊस पडणाऱ्या प्रदेशात या प्रकारची वने आढळतात. पाण्याच्या कमतरतेमुळे ज्या ठिकाणी सदाहरित वा आर्द्र पानझडी वृक्ष वाढू शकत नाहीत, अशा भागात त्यांची जागा शुष्क पानझडी वृक्षांनी घेतली आहे, असे आपणास म्हणता येईल.
(२) तुलनात्मकदृष्ट्या ही वने विरळ स्वरूपाची आहेत. विदर्भाचा काही भाग तसेच खानदेश व सह्याद्रीच्या पूर्वाभिमुख उतारावर ही वने आढळतात.
(३) साग, तिवस, खैर, धावडा, रोहन व ऐन या जातींचे वृक्ष या वनात वाढतात. यांपैकी साग हा वृक्षच फक्त आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असून इतर वृक्ष आर्थिकदृष्ट्या फारसे महत्त्वाचे नाहीत. या वनांतील लाकडाचा वापर मुख्यत्वे जळणासाठी केला जातो.
उष्ण-कटिबंधीय काटेरी वृक्षांची वने
(१) राज्यातील ८० सें. मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात ही वने आढळतात. ही वने अतिशय विरळ असून त्यांमध्ये मुख्यत्वे काटेरी वनस्पतीच आढळून येतात. राज्यातील पर्जन्य- छायेच्या प्रदेशात ही वने आहेत.
(२) बाभूळ, बोर, निंब, खैर हे या वनांतील प्रमुख वृक्ष होत. राज्यातील एकूण वनक्षेत्रापैकी १७ टक्के क्षेत्र या प्रकारच्या वनांनी व्यापलेले आहे.
किनाऱ्यालगतची वने
(१) किनारी भागात भरती आणि ओहोटी यांच्या दरम्यानच्या क्षेत्रात दलदलीच्या खारट जमिनीत मँग्रूव्ह प्रकारची वने वाढतात. या वनांतील झाडे अतिरिक्त व खारे पाणी, दमट हवामान व भरतीच्या वेळी वारंवार वाढणारे पाणी या सर्व परिस्थितीशी निसर्गतः जुळवून घेणारी असतात.
(२) महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर फार मोठे त्रिभुज प्रदेश नसल्याने खाड्यांच्या मुखाजवळील मर्यादित भागात या प्रकारची वने आहेत. या वनांतील लाकडांचा उपयोग मुख्यत्वे जळणासाठी केला जातो.
हे देखील वाचा: